बारामती : यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये दाखल आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अवघ्या तीन दिवसांत जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने आरोपींना दिलासा मिळाला आहे.
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९९९/२०२६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीला सासरच्या मंडळींकडून आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. चारित्र्यावर संशय घेणे आणि हुंड्याची मागणी करणे, अशा त्रासाला कंटाळून तिने पिंपळगाव येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पती विशाल जाधव, बानुबाई जाधव आणि मनोहर जाधव यांना अटक करण्यात आली होती.
अटकेनंतर आरोपींच्या वतीने बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपींवरील आरोप निराधार व सर्वसाधारण स्वरूपाचे असून, संबंधित कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने बचाव पक्षाने आपली बाजू मांडली. सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपी बानुबाई जाधव व मनोहर जाधव यांच्या वतीने ॲड. सुशांत तायडे, ॲड. तेजस कांबळे, ॲड. वृषभ मापारे आणि ॲड. विशाल यांच्या माध्यमातून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
“आरोपींवर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप करण्यात आले होते. त्यांना तातडीने जामीन मिळवून देण्यात यश आले असून, यापुढेही कायदेशीर लढा देऊन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया ॲड. वृषभ प्रदीप मापारे यांनी दिली.
अखेर न्यायालयातून दिलासा! अवघ्या तीन दिवसांत तिघांना जामीन मंजूर

निर्भीड महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरील ताज्या बातम्या वाचा.
← मुख्यपृष्ठावर परत जा