अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी: राष्ट्रीय शालेय खेळ महासंघाच्या वतीने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत प्रज्वल सुनील ढवळे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले. १७ वर्ष वयोगटात ८० किलो वजनगटामध्ये त्याने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राचा भगवा दिमाखात राष्ट्रीय पातळीवर उंचावल्याने श्रीगोंद्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या वतीने आयोजित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रज्वल ची महाराष्ट्र संघात निवड झाली.राष्ट्रीय स्पर्धेत देशातील २३ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्वलने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
प्रज्वलने पहिल्या फेरीत हरियाणाच्या रुपेंद्र कुमार याला, दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेशच्या शेख मौलाली याला, तर तिसऱ्या फेरीत झारखंडच्या अमन कुमार याला नॉकआउट करत सलग तीन विजय मिळवले. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, उपांत्य फेरीत बिहारच्या शिवम तिवारी याच्याकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रज्वलला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
प्रज्वल हा श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात इ.११ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तो येथील ग्रँड मास्टर संजय आनंदकर सर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये नियमित सराव करतो. त्याला अकॅडमीचे प्रशिक्षक सिद्धेश व जयेश आनंदकर यांच्यासह महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रज्वलचे वडील सुनील ढवळे हे जिल्हा कृषी विक्रेते असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.या यशस्वी प्रवासात आई-वडिलांसह कुटुंबीय, खेळाडू मित्र यांचे मोलाचे पाठबळ लाभले. कुटुंबाचा विश्वास, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि श्रीगोंदा करांचे शुभेच्छांमुळे राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकल्याचे प्रज्वलने सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळवून प्रज्वलने श्रीगोंदा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार विक्रमसिंह पाचपुते, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, मा.आ. राहुल दादा जगताप, राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, ग्रँड मास्टर संजय आनंदकर यांच्यासह क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, शिक्षक यांनी अभिनंदन केले. सर्व स्तरांतून प्रज्वलचे अभिनंदन होत आहे.
राष्ट्रीय शालेय वुशू स्पर्धेत प्रज्वल ढवळेला कांस्यपदक.

सलग तीन प्रतिस्पर्ध्यांना नॉकआउट करत गाठली उपांत्य फेरी; श्रीगोंद्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.
← मुख्यपृष्ठावर परत जा