अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव गाव हे विविधतेने नटलेले आणि सामाजिक ऐक्य जपणारे गाव म्हणून परिचित आहे. गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर प्राचीन काळापासून नवसाला पावणाऱ्या भवानी मातेचे मंदिर आहे. याच मंदिरात दरवर्षी शेडगाव गावचा पारंपरिक दसरा उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो.

दसऱ्याच्या दिवशी गावावर कोणतेही आसमानी संकट अथवा महामारी येऊ नये, गावात सुख-समृद्धी व शांतता नांदावी, यासाठी भवानी मातेला कौल लावण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. देवीने कौल दिल्यानंतर भवानी मातेला पालखीत विराजमान करून वाजत-गाजत गावात आणले जाते.

गावातील मानाच्या विविध ठिकाणी पालखी नेण्यात येते. दिवसभर पालखी गावामध्ये असते. ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. सायंकाळी आरती झाल्यानंतर पालखी पुन्हा भवानी माता मंदिराच्या दिशेने प्रस्थान करते.

या पारंपरिक दसरा उत्सवाचे गावकऱ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. नोकरी, व्यवसाय तसेच इतर कामानिमित्त बाहेरगावी असलेले शेडगावचे नागरिकही दसऱ्याच्या दिवशी आवर्जून गावात येतात. भवानी मातेचे मनोभावे दर्शन घेत उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण शेडगावमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होते.