वीर : निर्भिड महाराष्ट्र वृत्तसेवा

वीर (ता. पुरंदर) : पारंपरिक धार्मिक विधी, फुलांनी सजविलेली पालखी, आकर्षक विद्युतरोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीक्षेत्र वीर येथे मंगळवारी (दि. २०) श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा शाही सीमोल्लंघन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

विजयादशमीनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी सजविलेल्या मानाच्या काठ्या, छबिना, निशाण, छत्री आणि अब्दागिरी अशा पारंपरिक लवाजम्यासह सायंकाळी सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ झाली. यावेळी सालकरी, दागिनदार, मानकरी, देवस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालखीने तुकाईदेवीची भेट घेतल्यानंतर गावच्या वेशीवर विधिवत आपटापूजन करण्यात आले. त्यानंतर छबिन्यासह पालखीने मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक पगार वाटप सोहळा पार पडला.

फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत

दसरा उत्सवानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. फुलांनी सजलेली पालखी भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ झालेल्या पालखीचे ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा गजर, भाविकांचा उत्साह आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण वीर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

विजयादशमीच्या मुहूर्तावर श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी दरवर्षी श्रीक्षेत्र वीर येथे भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. आपल्या आराध्य दैवताचे दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडविणारा हा शाही सीमोल्लंघन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.