वीर (ता. पुरंदर) : गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषाने श्रीक्षेत्र वीरची भूमी महाआष्टमीला भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या नवरात्रोत्सवातील आठव्या माळेनिमित्त देव आणि भक्त कमळाजी यांच्या भेटीचा पारंपरिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी परिसरासह दूरवरून भाविकांनी वीर येथे गर्दी केली होती.

महाआष्टमीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची विधिवत महापूजा करण्यात आली. सकाळी सहा वाजता मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले होताच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. देवांची रिठ्याच्या पानांनी पूजा बांधण्यात आली होती. दुपारी बारा वाजता धूपारती झाल्यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत देवांचे मुखवटे विराजमान करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात छबिना काढण्यात आला. मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी दक्षिण दरवाजातून माळाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

फुलांनी सजविलेल्या मानाच्या काठ्या, छत्री, अब्दागिरी आणि पारंपरिक लवाजम्याने मिरवणुकीची शोभा अधिकच खुलवली. ढोल-ताशांचा दणदणाट, हवेत उधळला जाणारा गुलाल आणि ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. देवांचा लवाजमा माळावर दाखल होताच भाविकांमध्ये उत्साहाला उधाण आले. श्रीनाथ म्हस्कोबा आणि भक्त कमळाजी यांच्या पारंपरिक भेटीचा भावस्पर्शी क्षण अनुभवताना भाविकांनी भक्तिभावाने जयघोष केला. श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अनोखा आविष्कार या सोहळ्यातून अनुभवायला मिळाला.

देवस्थान ट्रस्टकडून चोख नियोजन; दर्शनासाठी विशेष व्यवस्था

श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवातील धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांच्या उत्सवकाळात नियमित पूजा, छबिना, पालखी प्रदक्षिणा, भजन, कीर्तन यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक लोककला, नृत्य, गायन आणि वादनाच्या सादरीकरणामुळे उत्सवाला सांस्कृतिक वैभवाची जोड मिळाली.

भाविकांच्या सेवेत मित्र परिवारांचे योगदान

महाआष्टमीच्या सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सेवा करण्यासाठी विविध मित्र परिवारांनी पुढाकार घेतला. वीर गावचे माजी सरपंच माऊली वचकल यांच्या मित्र परिवाराच्या वतीने भाविकांना दूध व केळींचे वाटप करण्यात आले. संघर्ष योद्धा ॲड. मंगेश ससाणे साहेब मित्र परिवारातर्फे उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच जनसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब गुलदगड यांच्या वतीने चहा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. भक्तिभावासोबतच सामाजिक बांधिलकी जपत या परिवारांनी भाविकांची सेवा केली. त्यांच्या या उपक्रमांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

श्रद्धा, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा अविस्मरणीय सोहळा

श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक श्रीक्षेत्र वीर येथे दाखल होतात. महाआष्टमीच्या आठव्या माळेला होणारा देव-भक्त कमळाजी भेटीचा सोहळा हा नाथभक्तांच्या श्रद्धेचा आणि पारंपरिक सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या या परंपरेतून भक्तीची ऊर्जा, लोकसंस्कृतीचे वैभव आणि सामूहिक श्रद्धेचे दर्शन घडते. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि देवस्थान ट्रस्टचे नियोजन यांमुळे यंदाचा महाआष्टमी सोहळा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरला.